यवतमाळ सामाजिक

*रमाई जयंती निमित्य अठरा तास अभ्यास अभियान*

रमाई जयंती निमित्य अठरा तास अभ्यास अभियान

( रमाई महिला मंडळाचे पुस्तक प्रेमींना आवाहन )

आर्णी (प्रतिनिधी): ६

शहरातील रमाई महिला मंडळाने रमाई जयंतीचे औचित्य साधून अठरा तास अभ्यास अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. अनोख्या अभियानात पुस्तक प्रेमीने सहभाग नोंदवावा असे आवाहन रमाई महिला मंडळ आर्णी द्वारा केले आहे.

शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला खरा; मात्र या त्रिसूत्रीची त्यांच्या अनुयायांकडून परिणामकारक अंमलबजावणी होताना दिसत नाही. बाबासाहेब सलग 18 तास अभ्यास करायचे आपणास सर्वांना अवगत आहे. मात्र याचे सर्वस्वी श्रेय ते माता रमाई यांना देत. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन माता रमाई याच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतानाच, फुले-शाहू-आंबेडकर अनुयायांचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा विडा आर्णी मधील रमाई महिला मंडळांनी उचलला आहे. माता रमाई जयंती दिन अर्थात ७ फेब्रुवारीचे औचित्य साधत १८ तास अभ्यास या अभिनव उपक्रमाचे रमाई महिला मंडळतर्फे फुले शाहू आंबेडकर स्टडी सर्कल, उरुवेला बौद्ध विहार, वैभव नगर आर्णी येथे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभाग घेणाऱ्यांसाठी विविध पुस्तके, मासिके, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. साधकांसाठी जागेवरच चहा, नाश्ता व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे जात-पात, धर्म, लिंग, वयोगट असा कोणताही भेद नसल्याने कोणीही स्त्री-पुरुष यात सहभाग घेऊन अभ्यासाचा निखळ आनंद लुटू शकणार आहेत. व्हाट्सअप-फेसबुकच्या अधीन झालेल्या युवा पिढीला वाचन संस्कृतीकडे आणण्याचा हा वेगळा प्रयोग केल्या जात असल्याचे महिला मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.

Copyright ©