Breaking News यवतमाळ राजकीय

*पालकंत्र्यांच्या विविध कार्यक्रमाचा आढावा*

 

 

 

 

जिल्ह्याच्या विकासासाठी 100 टक्के निधी मिळणार

 

 

– पालकमंत्री संजय राठोड

 

*उत्कृष्ट पंचायत समिती, ग्रामपंचायतींचा सत्कार*

 

यवतमाळ, दि. 27 : कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे विविध विकास कामांसाठी 33 टक्केच निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र संकटावर मात करून शासनाने ‘पुन:श्च हरीओम’ म्हणत नव्याने सुरवात केली आहे. त्यामुळे विकास कामांसाठी आता पूर्ण निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी 100 टक्के निधी मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

 

जिल्हा परिषदेमध्ये नुकताच उत्कृष्ट पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार तर मंचावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, समाजकल्याण सभापती विजय राठोड आदी उपस्थित होते.

 

विकासासाठी जिल्हा नियोजन समितीचा 100 टक्के निधी मिळणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, निधीमध्ये कोणतीही कपात होणार नाही. जनतेला दिलासा देण्यासाठी विविध विकासकामे पूर्ण करण्यावर भर असून प्रशासनाने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे गरजेचे आहे. व्ही-तारा कंपनी जिल्ह्यात जवळपास पाच हजार कोटींची गुंतवणूक करीत असल्यामुळे रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. सायकल अगरबत्तीबाबत सामंजस्य करार झाले असून जिल्ह्यातील पाच हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. अगरबत्ती निर्मितीच्या कामातून एक महिला 400 रुपये रोजमजुरी कमवू शकेल.

 

यावर्षी जलशक्ती मंत्रालयाकडून राबविण्यात आलेल्या सामुदायिक शौचालय अभियान अंतर्गत दारव्हा तालुक्यातील बोरी खुर्द ग्रामपंचायतीने देशातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, बाभुळगाव, दारव्हा, मारेगाव, वणी आणि केळापूर या सात पंचायत समित्यांनी वेळेपूर्वीच 100 उद्दिष्ट पूर्ण केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

जि.प.अध्यक्षा म्हणाल्या, ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद कटिबध्द आहे. जि.प.च्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांकडून नेहमी सहकार्य मिळत आहे. विकास कामांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सर्व अधिका-यांनी काम करावे. जि.प. अंतर्गत 100 गावे आदर्श म्हणून विकासीत केली पाहिजे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, नाविण्यपूर्ण तसेच गुणवत्तापूर्वक कामांसाठी पालकमंत्र्यांकडून नेहमी आग्रह धरला जातो. जि.प.च्या प्रत्येक शाळेत ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बोरी खुर्द ग्रामपंचायतीचा तसेच राळेगाव, यवतमाळ, बाभुळगाव आणि दारव्हा पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी आणि चमुचा सत्कार करण्यात आला. तसेच यशवंत पंचायत राज अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या प्रशांत गावंडे, सुरेश चव्हाण यांचा गुणवंत कर्मचारी म्हणून विशेष गौरव करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे संचालन किशोरी जोशी यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, कृषी विकास अधिकारी माळोदे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्रीमती धोंडे, यशवंत पवार यांच्यासह पं.स. सभापती, जि.प.सदस्य, सरपंच आदी उपस्थित होते.

_____________________________

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये लिफ्टचे उद्घाटन

 

यवतमाळ, दि. 27 :

ग्रामीण भागासाठी मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. यात दिव्यांग नागरिकांसह ज्येष्ठांचाही समावेश असतो. या नागरिकांना सुविधा व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, समाजकल्याण सभापती विजय राठोड आदी उपस्थित होते.

 

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट अतिशय आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अनेक सभापतींचे कॅबिन वरच्या माळ्यावर आहे. तेथे जाण्यासाठी दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत होता. त्या अनुषंगाने लिफ्ट बसविण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

 

सदर लिफ्ट ही 10 नागरिकांसाठी असून जोकवेरा प्राय. लिमि. कंपनीच्या वतीने ती लावण्यात आली आहे. सदर लिफ्टची एक वर्ष देखभालदुरुस्ती कंपनीकडे राहणार आहे. विशेष म्हणजे ज्या माळ्यावर लिफ्ट जाईल, तेथील सर्व विभाग दिसण्याची सुविधा यात आहे. तसेच इनबिल्ट आटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस बसविल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्यावरसुध्दा सदर लिफ्ट जवळच्या माळयावर जाऊन थांबेल. प्रशासकीय इमारतीमधील तीन माळ्यांसाठी ही लिफ्ट असल्याची माहिती देण्यात आली.

 

 

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते लस भांडार वास्तुचे लोकार्पण : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली आहे. लस साठवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या लस भांडार वास्तुचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीसाठी 40 लक्ष रुपये खर्च आला असून यात 22 फ्रिजर राहणार आहेत. यावेळी पालकमंत्र्यांनी इमारतीतील शित साखळी कार्यशाळा, शित साखळी गृह आदींची पाहणी केली.

 

 

_____________________________

 

बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना

 

*माजी सैनिक व विधवा पत्नी यांना मालमत्ता करातून सुट*

 

यवतमाळ, दि. 27 : बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत राज्यातील माजी सैनिक, विधवा, माजी सैनिक पत्नी तसचे शहीदांच्या माता – पितांना ग्राम पंचायत, नगर पंचायत व महानगरपालिकेच्या हद्दीतील एका रहिवाशी मालमत्तेकरीता सुट देण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सदर मालमत्ता सुट प्राप्त करून घेण्याकरीता जिल्ह्यातील लाभधारक माजी सैनिक, विधवा व अवलंबित पत्नी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

 

जिल्ह्यातील ज्या लाभधारक माजी सैनिक, विधवा व अवलंबित पत्नी यांनी आजतागायत मालमत्ता करातून सुट मिळण्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेतले नसेल, अशा सर्व लाभधारकांनी करमाफीचे प्रमाणपत्र त्वरीत घ्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता दुरध्वनी क्रमांक 07232-245273 वर संपर्क करावा, असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

 

___________________________

 

*18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह*

 

यवतमाळ, दि. 27 :

दरवर्षी जानेवारीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी शासनाद्वारे 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यात वाहनांना ट्रॅक्टर – ट्रॉली व वेगवेगळ्या वाहनांना रिफलेक्टर लावणे, मार्गदर्शनपर बॅनर लावणे, रस्ता सुरक्षा विषयक माहिती असलेले पत्रके वाटणे, मालवाहू वाहनांच्या चालकांची नेत्र तपासणी करणे, ड्रायव्हींग स्कुल प्रशिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा राबविणे, जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये या कार्यालयाचे मोटार वाहन निरिक्षक यांचे मार्फत वेगवेगळे कार्यक्रम घेणे व जनजागृती करणे आदींचा समावेश आहे.

 

यवतमाळ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती काढण्यासाठी बऱ्याच अर्जदाराची गर्दी होत असते. त्याचप्रमाणे इतर वाहनासंबंधीत कामासाठी सुध्दा लोक येत असतात. रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून कार्यालयात आलेल्या जनतेला, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांनी मार्गर्दान केले. तसेच विविध नियमांचे पालन व रस्त्यावरील अपघात कमी होतील यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.

 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल ओलांडून जाणे, वाहन क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, दारू पिऊन किंवा अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, या गुन्ह्यांसाठी 3 महिने वाहन चालक अनुज्ञप्ती निलंबित करण्यात येते. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांनी वाहनांचा विमा व वाहन चालक अनुज्ञप्ती असल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालवू नये, असे अनुज्ञप्ती काढण्यासाठी आलेल्या अर्जदारांना व विशेषकरून विद्यार्थ्यांना सांगितले.

 

यावेळी मोटार वाहन निरिक्षक निकम यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. याप्रसंगी या कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक डगळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांना रस्ता सुरक्षा विषयक शपथ दिली. कार्यक्रमाला मोटार वाहन निरिक्षक चौधरी, गावसाने तसेच वरिष्ठ लिपिक गुल्हाणे, रामटेके, भेंडारे, फुलमाळी व कार्यालयातील सर्व कर्मचारी हजर होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©