Breaking News यवतमाळ राजकीय सामाजिक

*रक्त संकलन वाहिनीमुळे जिल्‍ह्यात रक्तसाठा वाढेल*                                                           *- पालकमंत्री संजय राठोड*  *महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून वैद्यकीय महाविद्यालयाला वाहन हस्तांतरीत* *जिल्ह्यात 78 जण कोरोनामुक्त, 52 नव्याने पॉझेटिव्ह* *नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*

*रक्त संकलन वाहिनीमुळे जिल्‍ह्यात रक्तसाठा वाढेल*

 

*- पालकमंत्री संजय राठोड*

 

*महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून वैद्यकीय महाविद्यालयाला वाहन हस्तांतरीत*

 

*जिल्ह्यात 78 जण कोरोनामुक्त, 52 नव्याने पॉझेटिव्ह*

 

*नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*

 

 

 

 

यवतमाळ, दि. 23 :

जिल्ह्यात दरवर्षी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात येते. रक्तदान करणा-यांची जिल्ह्यात कमतरता नाही. मात्र ग्रामीण भागातील अनेक रक्तदाते शहरात येऊन रक्तदान करू शकत नाही. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी वनविभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रक्त संकलन वाहिनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्तसाठा वाढण्यास मदत होईल, असे राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

 

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संकलन वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख एम. रामबाबू, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, ऋषिकेश रंजन, व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता महाराष्ट्र वनविकास महामंडळाने रक्तसंकलनासाठी हे सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही रक्त संकलन वाहिनी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करतांना मनापासून आनंद होत आहे. जिल्ह्यात सिकलसेलग्रस्त तसेच थालेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांना दरमहा रक्त द्यावे लागते. शिवाय अपघातग्रस्तांनाही रक्ताची आवश्यकता असते. अशा वेळी जिल्ह्यात रक्ताचा मुबलक साठा असला पाहिजे. आतापर्यंत सामाजिक संघटना व आरोग्य यंत्रणेच्या वतीने शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलन केले जात होते. भविष्यातही रक्तदान शिबिरे आयोजित असली तरी रक्त संकलन वाहिनीद्वारे मात्र ग्रामीण भागात थेट जाऊन इच्छुकांकडून रक्त संकलन करणे अतिशय सोपे झाले आहे. विशेष म्हणजे शिबिरासाठी येणारा खर्च व वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होईल. या वाहनात जनरेटर व्यवस्था लावण्यात आल्याने रक्त संकलनात अडथळा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी जिल्ह्याला रक्त संकलन वाहिनीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासंदर्भात आलेल्या पत्रावर लगेच वनमंत्री म्हणून शेरा मारला व महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे सदर पत्र कार्यवाहीसाठी पाठविले. त्यांनी लगेच होकार कळवून अत्यंत कमी कालावधीत सामाजिक दायित्व निधीतून हे वाहन उपलब्ध करून दिले. या रक्तसंकलन वाहिनीमध्ये एकावेळी दोन रक्तदाते रक्त देऊ शकतात. मात्र भविष्यात एकाचवेळी 10 ते 15 रक्तदाते रक्त देऊ शकेल, अशी मोठी बस उपलब्ध करून द्यावी, अशा सुचना त्यांनी महामंडळाला दिल्या. या वाहनाची देखभाल व दुरुस्ती नियमित करावी. यात कुठेही खंड पडू देऊ नका, अशाही सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

 

यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, रक्त संकलनामध्ये गत तीन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अव्वल आहे. यावर्षीसुध्दा जास्तीत जास्त रक्त संकलन करा. जिल्ह्याचा भौगोलिक आकार बघता अशा प्रकारच्या आणखी एक-दोन वाहनांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी एम. रामबाबू यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

 

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, रक्त संकलन वाहिनी अद्ययावत सोयीसुविधांनी परीपूर्ण आहे. या वाहिनीची किंमत 26 लक्ष असून सहा व्यक्ती बसण्याची यात व्यवस्था आहे. दोन रक्तदाते एकाच वेळी या वाहिनीत रक्तदान करू शकतात. तसेच संकलित रक्ताच्या पिशव्या ठेवण्यासाठी 60 लिटरचा फ्रिज या वाहनात असून स्टाफसाठी बायोटॉयलेटची व्यवस्थासुध्दा आहे. सन 2018 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 123 शिबिरे घेऊन 14003 रक्त पिशव्या संकलित केल्या होत्या. 2019 मध्ये 128 शिबिराच्या माध्यमातून 13500 आणि 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी 142 शिबिराच्या माध्यमातून 9570 रक्त पिशवीचे संकलन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिरे आयोजित करणा-या विविध सामाजिक संघटनांचा प्राधिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात महाआरोग्य सेवा समिती, शिवशक्ती ऑटोडील, निस्वार्थ प्रेरणा प्रतिष्ठाण, सक्षम फाऊंडेशन यांच्यासह 25 संघटनांचा समावेश होता.

 

कार्यक्रमाचे संचालन डॉ. किरण भारती यांनी केले. यावेळी उपवनसंरक्षक केशव वाबळे, के.व्ही. भांबुरकर, विभागीय व्यवस्थापक कोरे, राजेंद्र गायवकवाड आदी उपस्थित होते.

 

_________________________

 

*जिल्ह्यात 78 जण कोरोनामुक्त, 52 नव्याने पॉझेटिव्ह*

 

यवतमाळ, दि. 23 :

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 78 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 883 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 831 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 386 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13932 झाली आहे. 24 तासात 78 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13123 आहे. तर जिल्ह्यात एकूण 423 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 135751 नमुने पाठविले असून यापैकी 135302 प्राप्त तर 449 अप्राप्त आहेत. तसेच 121370 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

________________________

 

*नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*

 

यवतमाळ, दि. 23 :

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे यांनी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते

Copyright ©