यवतमाळ राजकीय सामाजिक

*जिल्ह्यातील आजच्या विविध घडामोडी पहा सविस्तर*

यवतमाळ – मूर्तीजापूर रेल्वे ब्रॉडगेज करण्याची मागणी

 

पालकमंत्र्यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र

 

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्याच्या विकासाच्या तसेच दळणवळणाच्या दृष्टीने यवतमाळ – मूर्तीजापूर नॅरोगेज रेल्वे लाईन ब्रॉडगेज करण्याची मागणी राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे. रेल्वेमंत्र्यांनी सदर पत्र संबंधित विभागाला पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. तशी पोच त्यांनी पालकमंत्र्यांना पाठविली आहे.

 

जवळपास 150 वर्षांपूर्वी यवतमाळ – मूर्तीजापूर शकुंतला नॅरोगेज रेल्वे लाईनची निर्मिती ब्रिटीश कंपनी निक्सन ने केली होती. या कंपनीचा करार संपल्यामुळे सदर रेल्वे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या रेल्वेलाईनला ब्रॉडगेज केली तर जिल्ह्यात दळणवळणाच्या सोयीसुविधा निर्माण होण्यास मोठी मदत मिळेल. एवढेच नाही तर मुंबई – हावडा या मुख्य रेल्वे लाईनसोबतसुध्दा यवतमाळ – मूर्तीजापूर ही रेल्वे जोडली गेल्यास जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी यांना बाजारपेठेची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे या नॅरोगेज रेल्वे लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

___________________________

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरते रक्त संकलन वाहनाचे उद्घाटन

 

महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरीत

 

यवतमाळ, दि. 22 : महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) व्यावसाईक सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआर) ट्रस्टकडून जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज फिरते रक्त संकलन वाहनाचे हस्तांतरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला होणार आहे. या वाहनाचे उद्घाटन वने, भुकंप पूनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येईल.

 

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार, वनसंरक्षक रामराव, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, वन विभागाचे एन. वासुदेवन व रुषीकेश रंजन, उपवनसंरक्षक केशव वाबळे, विभागीय व्यवस्थापक श्री.कोरे आदींच्या उपस्थितीत रक्तसंकलन वाहनाचे लोकार्पण करण्यात येत आहे.

 

कंपनी ॲक्ट अंतर्गत व्यावसाईक सामाजिक जबाबदारी निधी अंतर्गत वनविकास महामंडळ (एफडीसीएम) कडून अंदाजे 35 लक्ष किंमतीचे सुसज्ज फिरते रक्त संकलन वाहन वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ यांना देण्यात येत आहे. या वाहनाने यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात तथा ज्या ठिकाणी तांत्रिक सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी रक्त संकलन शिबिर घेण्याकरीता फार मोठी सोय उपलब्ध होणार आहे

 

______________________

 

जिल्ह्यात एका मृत्युसह 69 जण नव्याने पॉझेटिव्ह

 

Ø 57 कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 69 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये कळंब तालुक्यातील 84 वर्षीय पुरषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 57 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 1160 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 69 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1091 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 351 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13880 झाली आहे. 24 तासात 57जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13045 आहे. तर जिल्ह्यात एकूण 423 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 134770 नमुने पाठविले असून यापैकी 134358 प्राप्त तर 412 अप्राप्त आहेत. तसेच 120539 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

_________________________

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या

 

नामांकित निवासी शाळेत नि:शुल्क प्रवेश

 

यवतमाळ, दि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुसद, उमरखेड, नेर, दारव्हा, दिग्रस, महागाव, आर्णी या सात तालुक्यांचा समावेश आहे. सन 2021-22 वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडून इयत्ता 1 ली व 2 री प्रवेशासाठी प्रवेश अर्ज कार्यालयात उपलब्ध आहे. अर्जासोबत खालील कागदपत्राच्या अटी व शर्ती पूर्ण करून परिपूर्ण अर्ज सादर करावेत. वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूरात दिलेल्या शाळांना व मंजूर संख्येनुसारच प्रवेश देण्यात येईल.

 

सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाचे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले अनुसूचित जमातीचे जातीच्या प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी. जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मुळ प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे अन्यथा दारिद्ररेषेसाठी विचार केला जाणार नाही. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्षपेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार) यांचे चालू वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.

 

इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पूर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला (अंगणवाडी, ग्रामसेवक) यांचा शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. विद्यार्थ्याचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. (वैद्यकीय अधिकारी, तालुका किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांचे), आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा/ घटस्फोट/निराधार/परितक्ता व दारिद्ररेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी न्यायालयीन निवाड्याची प्रत सोबत जोडावी.

 

विद्यार्थ्याचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरदार नसावेत. (नोकरदार नसल्याबाबत पालकांना लेखी लिहून द्यावे लागेल.), विद्यार्थ्यांना 2 री प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या संबंधीत शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत जोडावे लागेल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे आधारकार्ड जोडणे अत्यावश्यक आहे.

 

अर्ज सादर करण्याचा दिनांक 24 जानेवारी 2021 ते 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत. यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये सादर केलेली माहिती खोटी आढळून आल्यास तात्काळ प्रवेश रद्द करण्यात येईल. एकदा निवड झालेल्या विद्यार्थ्यास शाळा बदलून मिळणार नाही किंवा समायोजन केले जाणार नाही त्याबाबत पालकांचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. सर्वच अटीची पुर्तता करीत असलेल्या पालकांनीच अर्ज सादर करावेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी कळविले आहे.

Copyright ©