Breaking News यवतमाळ राजकीय सामाजिक

*जिल्ह्यातील महत्व पूर्ण घडामोडी*

 

 

 

*जिल्ह्यात 59 जण नवं बाधित, तर 52 बाधिता मधुन मुक्त*

 

 

यवतमाळ, दि. 21 :

गत 24 तासात जिल्ह्यात 59 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 52 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 504 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 59 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 445 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 401 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13811 झाली आहे. 24 तासात 52 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12988 आहे. तर जिल्ह्यात एकूण 422 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 133635 नमुने पाठविले असून यापैकी 133259 प्राप्त तर 376 अप्राप्त आहेत. तसेच 119448 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

____________________________

 

*1 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन*

 

यवतमाळ दि.21 :

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आायोजित केला जातो. सोमवार दि. 1 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे सकाळी 10 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सदर लोकशाही दिनात न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल्स प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, वैयक्तिक स्वरुपाची तक्रार, निवेदन असल्यास संबंधीत अर्ज स्वीकारले जाणार नाही.

 

तसेच महिन्याच्या तिसर-या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये अर्जाचे निरसण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. अर्ज दाखल करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

______________________________

 

*थकबाकीदारांनी थकीत मुद्रांक शुल्क व दंडाचा भरणा करावा*

 

यवतमाळ दि.21 :

सह जिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यवतमाळ कार्यालयातर्फे थकीत मुद्रांक शुल्क वसूली प्रकरणी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 46 नुसार जमीन महसूल कार्यवाही प्रारंभ करण्यात येणार आहे. यासंदर्भात थकबाकीदार यांच्याकडून थकीत रकमा वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या अखेरच्या ज्ञात पत्यावर नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याद्वारे निर्धारीत केलेल्या मुदतीच्या आत त्यांच्या नावासमोरील थकीत मुद्रांक शुल्क व दंडाचा भरणा थकबाकीदारांनी करावा.

 

दस्त क्रमांक 2082/2015, दिनांक 10 जुलै 2015 मधील सर्वोदय तिर्थ गौशाळा पुसदचे अध्यक्ष नितीन विरेंद्र आहाळे, विरेंद्रकुमार आहाळे यांच्यामध्ये शेतजमिनीबाबतचा झालेल्या व्यवहारामध्ये जमीन महसूलाच्या थकबाकीची एकूण रक्कम, कमी पडलेला मुद्रांक शुल्क रु. 1 लक्ष 20 हजार 195 व कमी पडलेली नोंदणी फी रु. 5 हजार 900 एकूण रक्कम रु. 1 लक्ष 26 हजार 95 वसूलीपत्र आहे.

 

दस्त क्रमांक 272 दिनांक 9 फेब्रुवारी 2017 मधील ट्रान्सफर इलेक्ट्रिकल्स प्रा. लि. तर्फे संचालक सुमेध सदानंद झाडे यांचेमध्ये मौजा लालगुडा ता. वणी बांधकाम सदर मिळकतीबाबत झालेल्या व्यवहारामध्ये जमीन महसूलाच्या थकबाकीची रक्कम रु. 57 हजार 900 वसूलीपात्र आहे.

 

दस्त क्रमांक 611, दिनांक 29 ऑगस्ट 2013 मधील जयराम ॲग्रो इंडस्ट्रीज सुर्दापूर तर्फे भागीदार सुनील मुकुंदराव कासावार, हनुमंतराव रंगराव कासावार, रमा सुनील कासावार, राणी हनुमंतराव कासावार यांचेमध्ये मौजा सुर्दापूर ता. झरी जामणी मालमत्तेबाबतच्या झालेल्या व्यवहारामध्ये जमीन महसूलाच्या थकबाकीची रक्कम रु. 1 लक्ष 21 हजार 200 वसूलीपत्र आहे.

 

दस्त क्रमांक 1018 दिनांक 9 एप्रिल 2010 मधील जगदीश हरदयाल व्यास विशाखा माईन्स ॲण्ड मिनरल्स आदिलाबाद तर्फे पार्टनर संजयकुमार गौरीशंकरजी अग्रवाल, अशोक त्र्यंबकराव मुस्तापुरे यांचेमध्ये मौजा खांदला ता. वणी येथील झालेल्या व्यवहारामध्ये जमीन महसूलाच्या थकबाकीची रक्कम रु. 1 लक्ष 78 हजार 203 वसूलीपात्र आहे.

 

वरील चारही थकबाकीदारांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 178 अन्वये नमुना 1 ची नोटीस बजाविण्यात आली आहे. या पक्षकारांनी निर्धारीत केलेल्या मुदतीच्या आत नावासमोर दर्शविण्यात आलेली जमीन महसूलाच्या थकबाकीची रकमेचा भरणा करावा, असे सह जिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

________________________

 

*राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा – जिल्हाधिकारी सिंह*

 

प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याचे आवाहन

 

यवतमाळ दि.21 : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण राज्यभर साजरे करण्यात येतात. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा हे प्रत्येक सुजान नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

 

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यांवर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरूक नागरीक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॉस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

 

तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करू नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधीत तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत. तसेच 26 जानेवारी 2021 रोजीच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Copyright ©