Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात 24 तासात 56 जण कोरोनामुक्त, 42 नव्याने पॉझेटिव्ह*

 

*शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा*

 

*बर्ड फ्ल्यू’ च्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट*

 

*14 ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा*

 

*शासकीय कोट्यातील रिक्त जागांसाठी विशेष फेरीद्वारे प्रवेश*

_________________________________

 

यवतमाळ, दि. 11 :

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 56 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 42 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 11) एकूण 222 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 180 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 435 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13243 झाली आहे. 24 तासात 56 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12398 आहे. तर जिल्ह्यात एकूण 410 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 129249 नमुने पाठविले असून यापैकी 128497 प्राप्त तर 752 अप्राप्त आहेत. तसेच 115254 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

_______________________________

 

शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

 

यवतमाळ, दि. 11 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढून अशा कुटुंबांना मदत देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन एकूण 9 प्रकरणे निकाली काढली.

 

यात बाभुळगाव तालुक्यातील कृष्णापूर येथील विजय विठ्ठल दहिफळे, आर्णि तालुक्यातील जांब येथील अतिष नरसिंह पवार, आर्णि तालुक्यातील बोरगाव येथील केशव मधुकर पवार, वणी तालुक्यातील उमरी येथील सुनील भावानी देवाळकर, दारव्हा तालुक्यातील ब्रम्हगाव येथील राजेश परशराम चव्हाण, नेर तालुक्यातील घेई येथील भिमराव नामदेव राठोड, नेर तालुक्यातील लोहतवाडी येथील विनोद सुखदेव राठोड, दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील नारायण भासू राठोड आणि कळंब तालुक्यातील मेटीखेडा येथील महादेव वसंतराव जगताप यांच्या प्रकरणांचा समावेश होता.

 

शेतकरी आत्महत्या प्रकरणातील कुटुंबियांना शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी, तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. एका आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांनी सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल करू नये, अशा सुचना त्यांनी केल्या.

 

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, पशुसवंर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्यासह संबंधित गावांचे तलाठी, पोलिस पाटील, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.

 

________________________________

 

‘बर्ड फ्ल्यू’ च्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट

 

यवतमाळ, दि. 11 : देशात ‘बर्ड फ्ल्यू’ संसर्गाचा धोका आढळून आला असून राज्यातसुध्दा काही ठिकाणी कोंबड्यांचा मृत्यु झाल्याची घटना निदर्शनास आली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अधिका-यांना निर्देश दिले आहेत.

 

जिल्ह्यात पोल्ट्री फार्म असलेल्या नागरिकांची माहिती तातडीने घेऊन त्यांच्या संपर्कात संबंधित अधिका-यांनी राहावे. प्राणी व पक्षांचा मृत्यु आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिका-यांना त्वरीत माहिती द्यावी. तसेच डॉ. क्रांती काटोले (मो. 7888036271) आणि डॉ. कोल्हे (मो. 9960394266) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

_______________________________

शासकीय कोट्यातील रिक्त जागांसाठी विशेष फेरीद्वारे प्रवेश

 

यवतमाळ, दि. 11 : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक शिक्षण पदविका (डी.ईआय. ईडी.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5 टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 टक्के गुणांसह) आहे. तर खुला संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता प्रवेश अर्ज शुल्क 200 रुपये, खुला संवर्ग वगळून इतर संवर्गाकरीता 100 रुपये प्रवेश अर्जाचे शुल्क आहे. याबाबत पुढीलप्रमाणे कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

 

दिनांक 11 जानेवारी ते 14 जानेवारी 2021 रोजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे. 11 ते 15 जानेवारी 2021 रोजी पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे. 11 ते 16 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लॉगीन मधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करून स्वत:चे प्रवेशपत्र काढून घेणे. 11 ते 20 जानेवारी 2021 रोजी प्राचार्य, संबंधीत अध्यापक विद्यालय यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांची पडताळणी करून स्वत:चे लॉगीन मधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲडमिट करून घेणे.

 

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून मंजूर करून घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन मंजूर केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रीयेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधून प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल / लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेच्या द्वितीय विशेष फेरीनंतर (डी. ईआय. ईडी.) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदच्या संचालकांनी कळविले आहे.

______________________________

 

14 ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा

 

 

यवतमाळ, दि. 11 : मराठी भाषेच्या वापरासंदर्भात राष्ट्रीय कार्यालयाबरोबर शैक्षणिक सहभाग वाढावा म्हणून दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने जिल्हा क्रीडा अधिकारी, यवतमाळ यांच्या वतीने मराठी संवर्धन पंधरवाडा दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.

 

क्रीडा क्षेत्रातील खेळाडू मुला – मुलींनीसुध्दा मराठी भाषेची जोपासना करून भाषेचा प्रचार व प्रसार या मुख्य धोरणास अनुसरून विविध उपक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धा खेळाचे जीवनातील महत्व आपल्या आवडत्या खेळाडू वृत्त लेखन, क्रीडा विषयक चारोळी व म्हणी स्पर्धा, क्रीडा गीत लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येत आहे. वर्ग 5 ते 8 व वर्ग 9 ते 12 अशा दोन गटात विविध स्पर्धा घेण्यात येत आहे.

 

प्रत्येक स्पर्धेकरीता गटानुसार प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना बक्षीस दिल्या जाईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू मुला मुलींनी विविध स्पर्धेतील विषयानुसार आपण लिहीलेल्या निबंध वृत्त लेखन चारोळी, म्हणी व क्रीडागीत स्पर्धातील विषय, घरीच लिहून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे वर्ग किंवा वयाचा दाखला सोबत जोडून, वैयक्तिक संपर्क नाव व पत्ता भ्रमणध्वनीसह दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणून द्यावे.

 

अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक सचिंद्र मिलमिले, भ्रमणध्वनी 9423645421 व जितेंद्र सातपुते 9423306577 यांच्याशी संपर्क करून जास्तीत जास्त खेळाडू मुला मुलींनी सहभागी व्हावे, असे क्रीडा अधिकारी, यवतमाळ यांनी कळविले आहे.

Copyright ©