Breaking News यवतमाळ सामाजिक

24 तासात बाधितांपेक्षा बरे होणारे 427 ने जास्त 658 जण पॉझेटिव्ह, 1085 कोरोनामुक्त, 8 मृत्यु*. *इतर महत्व पुर्ण घडामोडी सविस्तर*

 

 

यवतमाळ, दि. 14 : चालू आठवड्यात सलग पाचव्या दिवशीसुध्दा जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर गत दोन दिवसांपासून मृत्युच्या आकड्यातही कमी आली असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 427 ने जास्त आहे. जिल्ह्यात 658 जण पॉझेटिव्ह तर 1085 जण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांचा मृत्यु झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सात तर एक मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 8451 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 658 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7793 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5387 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2439 तर गृह विलगीकरणात 2948 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 66475 झाली आहे. 24 तासात 1085 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 59503 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1585 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.84 , मृत्युदर 2.38 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील 56 वर्षीय महिला व 77 वर्षीय पुरुष, नेर येथील 45 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 50 वर्षीय महिला, बाभुळगाव येथील 52 वर्षीय पुरुष आणि वणी येथील 65 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 658 जणांमध्ये 410 पुरुष आणि 248 महिला आहेत. यात पांढरकवडा येथील 128 पॉझेटिव्ह रुग्ण, यवतमाळ 95, मारेगाव 75, वणी 67, दारव्हा 56, झरीजामणी 41, राळेगाव 28, आर्णि 25, बाभुळगाव 25, महागाव 22, पुसद 20, दिग्रस 17, उमरखेड 15, नेर 14, घाटंजी 13, कळंब 9 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 517649 नमुने पाठविले असून यापैकी 514793 प्राप्त तर 2856 अप्राप्त आहेत. तसेच 448318 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 949 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नऊ डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 949 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 402 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 175 बेड शिल्लक, नऊ डीसीएचसीमध्ये एकूण 506 बेडपैकी 173 रुग्णांसाठी उपयोगात, 333 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 658 उपयोगात तर 441 बेड शिल्लक आहेत.

कोव्हीशिल्डच्या दुस-या डोजचा कालावधी 12 ते 16 आठवड्यांचा : केंद्र शासनाच्या सुचनेनुसार कोव्हीशिल्ड लसीसाठी दुस-या डोजचा कालावधी 12 ते 16 आठवड्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोज दिल्यानंतर दुसर डोस 12 ते 16 आठवड्याच्या अंतराने देण्यात येणार आहे. तर कोव्हॅक्सीन लसीच्या सुचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोज पूर्वीप्रमाणेच चार आठवड्याच्या अंतराने देण्यात येईल. उपलब्ध लसीचा साठा प्राधान्याने दुस-या डोजसाठी करण्यात येणार असून कोव्हीशिल्ड लसीचा उपलब्ध साठा ज्या हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंट लाईन वर्कर यांचा दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांना प्राधान्याने तर उर्वरीत साठा 45 वर्षांवरील वयोगटातील लाभार्थ्यांच्या पहिल्या डोजसाठी वापरण्यात येईल.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 3 लक्ष 42 हजार 225 जणांचे लसीकरण झाले असून गुरूवारी एकाच दिवशी 3318 लोकांचे लसीकरण करण्यात आले.

 

_______________&_______

प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रात्यक्षिके

व बियाणे मिनी कीटसाठी अर्ज आमंत्रित

महाडीबीटी पोर्टलवर 20 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 14 : सन 2021 – 22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामाध्ये प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनी किटसाठी शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शेतक-यांना नोंदणी करण्यासाठी 20 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करावयाचे आहे.

प्रमाणित बियाणे वितरणासाठी एकूण किमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तूर, मूग व उडीद बियाणांसाठी दहा वर्षाआतील वाणास 50 रुपये प्रति किलो अनुदान, दहा वर्षांवरील वाणास 25 रुपये प्रति किलो अनुदान देय राहील. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तृणधान्य अंतर्गत ज्वारीसाठी सरळ वाणाच्या बियाणासाठी दहा वर्षाआतील वाणास 30 रुपये प्रति किलो अनुदान, दहा वर्षांवरील वाणास 15 रुपये प्रति किलो अनुदान आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य अंतर्गत सोयाबीनसाठी 10 ते 15 वर्षापर्यंतच्या वाणास 12 रुपये प्रति किलो अनुदान देय राहील. एका शेतक-याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येईल.

पीक प्रात्यक्षिके : पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतक-याला एक एकर मर्यादीत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मुलद्रव्ये, भूसुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतक-याला एका एकराच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानूसार 2 हजार ते 4 हजार रुपये प्रति एकर डीबीटी तत्वावर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण प्रक्रियेचा वापर करणे अनिवार्य आहे.

बियाणे मिनी किट : सोयाबीन / ज्वारी / कापूस / मका या पिकांमध्ये मिनी किट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे.

तूर बियाणे मिनी किट : निवड झालेल्या शेतक-यांना खरीप हंगाम 2021 मध्ये तूर पिकाची चार किलोची एक बियाणे मिनी किट देण्यात येईल. तूर 412 रुपये प्रति चार किलो मिनी किट प्रमाणे अनुदान देय असून बियाणे मिनी किटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतक-यांची अदा करावयाची आहे. तसेच शेतक-यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कळविले आहे.

______________&________

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनासंदर्भात संवाद व प्रबोधन केंद्र कार्यान्वित

प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात होणार मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 14 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाएवढीच नागरिकांची भुमिका सुध्दा महत्वाची आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, या उद्देशाने नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचत भवन येथे संवाद व प्रबोधन कक्ष (कोरोना मदत कक्ष) कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या कक्षाचे नुकतेच उद्घाटन केले.

जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार स्थानिक सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने संचलित संवाद व प्रबोधन कक्ष सुरू करण्यात आला आहे. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, सदर कक्षामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साथरोग नियम पाळणे, सार्वजनिक तसेच कौटुंबिक समारंभ आयोजकांशी थेट संपर्क करून कार्यक्रमातील गर्दी टाळण्याबाबत आवाहन केले जाणार आहे. घरातील कर्त्या पुरुषांना अशा प्रकारे केले जाणारे थेट आवाहन समारंभातील गर्दी टाळणारे ठरेल. तसेच या केंद्राद्वारे कोरोना संसर्ग प्रतिबंधक जाणीवजागृती आणि तशा प्रकारची घोषवाक्ये, लघु वृत्तपट, माहिती पट, संदेश चित्रे तयार करून सामाजिक माध्यमातून सार्वत्रिक केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेची यंत्रणासुद्धा याकामी मदत केंद्राला सहकार्य करेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले. मदत केंद्राचे समन्वयक प्रा. घन:श्याम दरणे यांनी उपस्थितांना मदत केंद्राच्या कामाचे प्रारूप स्पष्ट करताना सांगितले की, संवाद कौशल्यात निपून असणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी हे केंद्र जबाबदारीने सांभाळतील आणि कोरोना संसर्गाच्या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतील.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, प्राचार्य डॉ. अविनाश शिर्के, प्रा. डॉ. सीमा शेटे आणि मदत केंद्र सांभाळणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Copyright ©