यवतमाळ सामाजिक

अपघाती मृत्यूपासून वाचविण्यासाठी मोकाट श्वानांच्या गळ्यात रेडियम पट्टे लावणे – ओलावा पशुप्रेमी संस्था, यवतमाळचा आगळावेगळा उपक्रम सुरु

अपघाती मृत्यूपासून वाचविण्यासाठी मोकाट श्वानांच्या गळ्यात रेडियम पट्टे लावणे – ओलावा पशुप्रेमी संस्था, यवतमाळचा आगळावेगळा उपक्रम सुरु

ओलावा पशुप्रेमी संस्था गेल्या तीन वर्षांपासून यवतमाळ शहर आणि आसपासच्या गावात मोकाट प्राण्यांच्या आरोग्य रक्षणासाठी निरंतर कार्य करीत आहे.

याअंतर्गत पक्ष्यांसाठी नैसर्गिक घरटे वितरण, प्राण्यांना पाणी पिण्यासाठी टाके वितरण, श्वान पिल्लांचे मोफत दत्तक शिबीराचे आयोजन असे अनेक अभिनव उपक्रम ओलावा संस्था राबवत असते.

या शिवाय मोकाट श्वानांचा खरूज नायनाट करण्यासाठी औषधोपचाराची मोहीम राबविणे, श्वानांचे रेबीज लसीकरण करणे, मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण करणे, इत्यादी अनेक प्रकारचे उपक्रम संस्था नियमितपणे राबवते.

गाय, बैल, सांड, घोडा, मांजर, पक्षी, कासव यांना अपघात, आजारपणात योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन, औषधोपचार , शस्त्रक्रियेसाठी मदत लोकसहभागातून उपलब्ध करून त्यांच्या स्वास्थ्य संवर्धनासाठी ओलावा संस्था सतत प्रयत्नशील असते.

यातच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणारे मोकाट श्वानांचे दैनंदिन अपघाती मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी ओलावा संस्थेने आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. हा उपक्रम म्हणजे रात्रीच्या अंधारात वाहनांच्या उजेडात स्वयंप्रकाशित होणारे रेडियमचे पट्टे मोकाट श्वानांचा गळ्यात बसवणे. याद्वारे वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात दुरुनच मोकाट श्वान दिसल्याने वेळीच वेग नियंत्रणात आणून श्वानांचे तसेच वाहनचालकांचे होणारे अपघात नियंत्रणात आणण्यात मदत मिळणार आहे.

शहरातील पशुप्रेमी, दानशूर सीएमपी ट्रस्टने श्वानांचे असे अपघात, अपंगत्व आणि होणारे मृत्यू टाळण्यासाठी पुढाकार घेऊन या उपक्रमासाठी रेडियमचे पट्टे उपलब्ध करून देण्यासाठीचा चरणबध्द संकल्प जाहीर करुन पहिल्या चरणाचा शुभारंभ केलेला आहे. यवतमाळातील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) वर श्वानांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे लावून या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्री. अनिल पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला सौ. सुधाताई पटेल, डॉ.आलोक गुप्ता, डॉ. विजय कावलकर, दीपक बागडी, डॉ. माया गायकवाड, सुमेध कापसे, महावीर सुराणा, राजेश कोठारी, शशिकांत पकाले, कुमार चौधरी, कार्तिक चौधरी, हर्षवर्धन मुद्दलवार, कैलास पटले आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथमचरणाच्या या उपक्रमाचे सकारात्मक आणि दृश्यमान परिणाम लौकरच शहरभर यवतमाळकरांच्या दृष्टीस पडतील. तसेच श्वान आणि वाहनचालकांना होणाऱ्या अपघातात, या रेडियम पट्ट्यांचा लावण्यामुळे लक्षणीय घट दिसून येईल. परिणामी श्वान आणि मनुष्य यातील संघर्ष टळून परस्पर विश्वासाचे नाते घट्ट व्हायला मदत होईल असा विश्वास ओलावा संस्थेचे सुमेध कापसे यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.

ओलावा संस्था लोकसहभागातून अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवून जीवदयेच्या कार्यात मोलाचे योगदान देत आहे. यवतमाळकरांनी अशा अनेक अभिनव संकल्पना राबवून प्राणी आणि मनुष्य यांच्यातील नाते घट्ट करण्यासाठी ओलावा संस्थेशी ७५५८३ ४९०१९ वर संपर्क साधावा असे आवाहन या निमित्ताने ओलावाचे श्री सुमेध कापसे यांनी केले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©